अरविंद केजरीवाल यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा, दिल्लीला मिळणार नवा “CM”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “अरविंद केजरीवाल यांनी आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. केजरीवाल म्हणाले की, ‘मी दोन दिवसात राजीनामा देणार आहे. विधिमंडळ दोन दिवसात दिल्लीचा नवा मुख्यमंत्री निवडेल.
जोपर्यंत जनता निर्णय देत नाही, तोपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही.’ केजरीवाल जाहीर सभेमध्ये बोलत होते.
मी प्रत्येक घरात जाणार आहे, लोकांशी बोलणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण, माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की, त्यांनी नोव्हेंबरमध्येच निवडणूक घ्यावी. जोपर्यंत दिल्लीची जनता आपला निर्णय देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर बसणार नाही. आता सर्वकाही लोकांच्या हाती आहे, असं केजरीवाल म्हणाले आहेत.
कोर्टाने मला जामीन दिला आहे. पण, हे प्रकरण लांबपर्यंत चालणार आहे. १० ते २० वर्ष हा खटला सुरु राहू शकतो. आता जनतेने ठरवावे ते केजरीवाल यांना प्रामाणिक समजतात की गुन्हेगार समजता. मी दोन दिवसात सीएम पदाचा राजीनामा देत आहे. त्यानंतर लोकांच्या घराघरात जाऊन त्यांना मी विचारणार नाही, असं केजरीवाल म्हणाले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय कोर्टाने जामीन मंजूर करताना काही अटी ठेवल्या होत्या. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करणं अवघड होणार होतं. त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, काही महिन्यांसाठी का होईना दिल्लीना आता नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. आपमधील एका नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्र्याची माळ पडू शकते.
अरविंद केजरीवाल सध्या मुख्यमंत्री असले तरी त्यांना मुख्यमंत्री म्हणून कुठल्याही सहीचा अधिकार दिलेला नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट ही LG यांच्या सल्यानेच करावी लागणार आहे. जर सहीचा अधिकार नसेल तर कुठलेही काम करता येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. सोबतच, फेब्रुवारी २०२५ मधे दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने केजरीवाल यांनी जनतेत जाण्याचा निर्णय पसंद केल्याचं दिसत आहे.