पुण्यात तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर मोक्का लावण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे पुणे हादरलं आहे.
दरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना आरोपीवर मोक्का लावण्याचे आदेश दिले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, “पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात आज सकाळी तरुणीवर हल्ला करण्यात आला. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या तरुणीला वाचवण्यात स्थानिक तरुण लेशपाल जवळगे याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि आरोपीला पोलीसांच्या ताब्यात दिले. लेशपालचे मनापासून आभार! शासनाने महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.”
चंद्रकांत पाटील म्हणाले, “असे प्रकार थांबविण्यासाठी कठोर कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तसेच अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसंगी दोषींवर मोक्काप्रमाणे कलमं लावून, गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.”
काय आहे प्रकरण?
मंगळवारी सकाळी सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत तरुणी थोडक्यात बचवली, तर तिच्यासोबत असलेला मित्रही जखमी झाला आहे. शंतून जाधव असं आरोपीचं नावं आहे. आरोपी आणि तरुणी आधीपासून एकमेकांना ओळखतात.
मंगळवारी सकाळी मित्राच्या स्कूटीवरुन तरुणी कॉलेजला जात होती. त्यावेळी शंतनू अचानक दोघाच्या समोर आला. काही क्षणात आरोपीने बॅगेतून कोयता काढला आणि हल्ला केला. त्यावेळी तरुणीसोबत असलेल्या तिच्या मित्राने मधे येत शंतनूचा प्रतिकार केला. यात तोही जखमी झाला. दरम्यान घटनास्थली उपस्थित असलेले काही तरुण मुलीच्या मदतीला धावले, त्यामुळे ती थोडक्यात बचावली.
“त्या” धाडसी तरुणांचा सत्कार
दरम्यान या हल्ल्यात मुलीचे प्राण वाचवणाऱ्या जिगरबाज तरुणांचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सत्कार करण्यात आला. महिला भगिणीच्या हस्ते या तरुणांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे विद्यार्थी हर्षद पाटील, सतीश नेहुल , दिनेश मडवी आणि त्यांच्या इतर मित्रांनी प्रसंगावधान ओळखून धाडसाने मुलीचे प्राण वाचवले. एवढंच नाही तर त्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची सर्वत्र चर्चा होत असताना, या विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे.