आनंदन तेलतुंबडे यांची एनआयए कोठडी 25 एप्रिलपर्यंत वाढवली
मुंबई. दलित स्कॉलर आणि कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने त्यांच्या अतिरिक्त कोठडीची मागणी केली होती, ती येथील विशेष न्यायालयाने शनिवारी मान्य केली आहे. विशेष कोर्टाच्या निकालानुसार, आनंद तेलतुंबडे यांना आता 25 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यातच ठेवले जाणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर दलित स्कॉलर तेलतुंबडे यांनी प्रशासनासमोर स्वतः हजेरी लावली. यानंतर 14 एप्रिल रोजी एनआयएने त्यांना अटक केली.
आनंद तेलतुंबडे यांच्यावर एल्गार परिषद आणि कथित नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने त्यांची कोठडी संपुष्टात येत असताना विशेष न्यायालयात ती वाढवण्याची मागणी केली. तेलतुंबडे यांची अजुनही सविस्तर चौकशी झाली नाही असा युक्तीवाद एनआयएने कोर्टात मांडला. हा युक्तीवाद कोर्टाने मान्य करून त्यामध्ये सात दिवसांची वाढ केली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलित आयकॉन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलतुंबडे नातेवाइक आहेत. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच तेलतुंबडे यांना झालेल्या अटकेनंतर अनेक दलित नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या अटकेचा निषेध केला.