काल ‘सागर’ बंगल्यावर खलबतं, आज शिंदे दिल्लीला रवाना ; राजकीय चर्चांना उधाण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यासाठी पुण्यावरून रवाना झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. या भेटीमध्ये एकनाथ शिंदे हे कोणाची भेट घेणार? यावरही चर्चा सुरू आहे.
केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदरीत राजकीय घडामोडी वाढल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली फेऱ्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मंत्रिमंडळ विस्तार आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनुसार विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत दिल्ली स्तरावर हालचाली सुरू आहे.
त्यामुळे निवडणुका कधीही लागू शकतात, अशी चर्चा आता रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आहे. नार्वेकर यांनी आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवली आहे. या घटनेचा अभ्यास करून 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाणार आहे.
यावर सल्ला मसलत करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याची चर्चा रंगली आहे.
‘सागर’ बंगल्यावर खलबतं देशातील सर्वात महत्त्वाची असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलवण्यात आली होती.
मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदारांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. विधानसभा, विधानपरिषद आमदार आणि लोकसभा व राज्यसभा खासदार या बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदार व खासदारांना मार्गदर्शन केल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर महत्त्वाची रणनीती या बैठकीत ठरली असल्याची माहिती आहे.