दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाले आहे. यातच विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे.
आज (ता. २) विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि वर्धा येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेला आहे.
तर जळगाव, सोलापूर, धुळे, परभणी, वाशीम, यवतमाळ येथे पारा ४२ अंशांच्या पुढे होता. विदर्भ, मराठवाड्यात तापमान चाळिशीपार असून, मध्य महाराष्ट्र, कोकणातही उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे.
उत्तर अंदमान समुद्रात, म्यानमारजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता असून, आज (ता. २) विदर्भासह, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात उष्ण व दमट त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३९.६ (२२.३), जळगाव ४२.७ (२८.०), धुळे ४२ (-), कोल्हापूर ३६.८ (२४.६), महाबळेश्वर ३१.७ (१७.६), नाशिक ३९.३ (२३.२),
निफाड ४१.१ (२४.४), सांगली ३७.५ (२५.०), सातारा ३९.७ (२३.१), सोलापूर ४२.५ (२७.४), सांताक्रूझ ३५.३ (२६.८), डहाणू ३४.७ (२७.१), रत्नागिरी ३४.१ (२७.६), औरंगाबाद ४१ (२६.०), नांदेड ४१.६ (२८), परभणी ४२.७ (२७.५), अकोला ४३.७ (२८), अमरावती ४३.४ (२४.१), बुलडाणा ४०.३ (२७.८), ब्रह्मपुरी ४१.४ (२५.४),
चंद्रपूर ४१.८ (२६.२), गोंदिया ४१.४ (२४.२), नागपूर ४१.९ (२४.१), वर्धा ४३ (२६.५), वाशीम ४२ (-) यवतमाळ ४२ (२३).
अरबी समद्रात कमी दाब क्षेत्राचे संकेत
अरबी समुद्राच्या आग्नेय भागात सोमवारी (ता. ५) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवार (ता. ७) पर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.