राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी, आमदार मुंबईकडे रवाना, अजितदादांनी मौन सोडलं…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप होणार का? याबाबत चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवार राष्ट्रवादीमध्ये नाराज असून ते लवकरच भाजपसोबत जाणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकीकडे आमदार मुंबईच्या दिशेने येत असतानाच दुसरीकडे अजित पवारांनी त्यांचे आजचे पुण्याचे कार्यक्रम रद्द केले, त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. या सगळ्या चर्चांवर अखेर अजित पवारांनी मौन सोडलं आहे. ‘खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो.
सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे’, असं अजित पवार म्हणाले.
‘मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही,’, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
आमदार मुंबईकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि अण्णा बनसोड हेदेखील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आपण मुंबईमध्ये बैठकीसाठी जात आहोत, असं पिंपरीचे आमदार अण्णा बनसोड यांनी सांगितलं. पक्षाच्या बैठकीला सगळे आमदार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी गोड बातमीची वाट पाहत असल्याचं अण्णा बनसोड म्हणाले.