‘मिशन ४५’बाबत अमित शाहांची शिंदे-फडणवीस यांच्याशी चर्चा, वज्रमूठ सैल करण्याची ठरली रणनीती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लोकसभा निवडणुकीत राज्यातून ४५ जागा निवडून आणण्याबाबतच्या रणनीतीविषयी चर्चा केली.
महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिंदे, फडणवीस यांच्याव्यतिरिक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हेही सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीला उपस्थित होते. ‘मिशन ४५’ सोबतच राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि सर्वोच्च न्यायालयाचा संभाव्य निकाल कशा पद्धतीने येऊ शकतो व निकालानंतरच्या परिस्थितीत कोणती भूमिका घ्यायची यावर बैठकीत मंथन झाले. महाविकास आघाडीत सावरकर यांच्या मुद्द्यावरून तसेच उद्योगपती अदानीप्रकरणी संयुक्त संसदीय समितीवरून समोर आलेल्या मतभेदांविषयी शिंदे-फडणवीस यांनी शाह यांना यावेळी माहिती दिली. बैठकीनंतर अमित शाह पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्या घरी गेले. तावडे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. शाह यांनी तावडेंचे सांत्वन केले.
‘विरोधकांना लोकाभिमुख निर्णयांनी उत्तर द्या’
राज्य सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची माहिती शिंदे-फडणवीस यांनी शाह यांना दिली. भावनिक मुद्द्यांपेक्षा लोकाभिमुख निर्णय घेणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी व त्यातून सामान्य माणसाच्या दारापर्यंत सरकार पोहोचविण्यावर भर देण्याचा सल्ला शाह यांनी दिला. विरोधकांच्या हातात भावनिक मुद्द्यांशिवाय काहीही नाही. मात्र, लोकांना सरकारकडून निर्णयांची अपेक्षा आहे. विरोधकांच्या आरोपांच्या जाळ्यात न अडकता लोकाभिमुख निर्णयांनी उत्तर द्या, असा सल्लाही शाह यांनी दिल्याचे समजते.