अजितदादांवर आता शरद पवारांचाच विश्वास राहिला नाही ; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू- काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांची संख्या कमी झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर त्यांचे काका शरद पवार यांचाच विश्वास नाही, जनता कशी ठेवणार तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचाच पक्ष गांभीर्यानं घेत नाही.
देशातील जनता कशी घेणार, अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केली.
कऱ्हाड येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र लोकसभा संयोजक प्रमोद जठार, विक्रम पावसकर, धनाजी पाटील, एकनाथ बागडी आदी पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री मिश्रा म्हणाले, ‘राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला आम्ही गांभीर्यानं घेत नाही. कारण, त्यांच्याच पक्षातील लोक राहुल गांधी यांना गांभीर्यानं घेत नाहीत, तसंच अजित पवार यांनीच दबावतंत्र वापरून विरोधी पक्ष नेतेपद मिळवलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठीही वाटाघाटी करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या काकांचाच विश्वास त्यांच्यावर राहिला नाही. भारतीय जनता पक्ष साताऱ्यासह सर्व महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांत जिंकण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे.” अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा लोकसभा मतदारसंघात विश्वासपूर्ण संघटन झालं आहे.’
‘भाजप सतत काम करणार पक्ष आहे’
मिश्रा (Ajay Kumar Mishra) म्हणाले, ”तीन वर्षांत इडीनं (ED) केलेल्या कारवाईतून देशाला तीनशे कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली आहे. ईडीचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांचा आरोप निराशेच्या भावेतून होत आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू- काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांची संख्या कमी झाली असून, या ठिकाणी पर्यटनास चालना मिळाली आहे. याचबरोबर चीन सीमा भागातही चांगली सुरक्षा यंत्रणा असून, एक इंचही चीन अतिक्रमण करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप सतत काम करणार पक्ष आहे. देशातील सर्व धर्मीय लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्याचे लक्ष्य ठेवून पक्ष काम करत आहे. देशाच्या सेवा, सुरक्षा, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक प्रश्नांवर काम सुरू असल्यामुळेच भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आहे.”
उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी धोका दिला
देशांतर्गत समस्या सोडवून जागतिकस्तरावर देशाला समृद्ध, शक्तिशाली बनवण्याचे काम भाजप करत आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या जनतेला धोका दिला आहे. ठाकरेंमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीत अडथळा आला असून, महाराष्ट्र १० वर्षे मागे गेला आहे. महाराष्ट्राला यापुढे प्रगतिपथावर नेण्यासाठी काम करणाऱ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाची वाटचाल सुरू आहे.