उज्ज्वल निकम यांचा राजीनामा ; राज्य सरकारनेही स्वीकारलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभेच्या पाचव्या टप्यातील निवडणुकीसाठी आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुंबईतील तीन उमेदवार आज अर्ज भरत आहेत. आज शिवसेनेचे रविंद्र वायकर, यामिनी जाधव अर्ज भरणार आहेत तर, भाजपकडून उज्ज्वल निकम अर्ज भरणार आहेत.
आता उमेदवारी अर्ज भरण्याआधी उज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. निकम लढत असलेल्या जवळपास 29 केसेसमधून त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकारने निकम यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आज उज्वल निकम आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्जांची छाननी उद्या केली जाणार आहे.
उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निकम यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. उज्वल निकम हे कायमच हायप्रोफाईल केससमुळे चर्चेत येत असतात. उज्ज्वल निकम यांचा जन्म 30 मार्च 1953 साली झाला. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले. उज्ज्वल निकम यांना ‘प्रमोद महाजन’ स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील आहेत. ज्यांनी प्रामुख्याने हत्या आणि दहशतवादाच्या खटल्यांवर काम केले आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यातील संशयितांवर खटला चालवण्यास त्यांनी मदत केली. 2013 मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण, 2016 कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात ते विशेष सरकारी वकील देखील होते. 26/11 मुंबई हल्ल्याच्या खटल्यात राज्याच्या वतीने उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला.