कोरोनाबाबत केंद्र सरकारची सावध पावलं, राज्यांना केलं अलर्ट ; जाणून घ्या काय दिल्या सूचना….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज पुन्हा एकदा राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली. चीन आणि जपान या दोन्ही देशांमध्ये करोना वाढतो आहे त्यामुळे केंद्र सरकार प्रचंड सावध झाल्याची चिन्हं या बैठकीत दिसून आली आहेत.
कारण सलग तीन दिवस करोनावर उपाय योजना करण्यासाठी बैठक घेण्यात येते आहे.
जगभरात करोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी तातडीने बैठका घेऊन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
मनसुख मांडवीय यांनी राज्यांना काय सूचना दिल्या आहेत?
नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. तो लक्षात घेऊन टेस्ट- ट्रॅक-ट्रीट आणि व्हॅक्सिनेशन यावर भर द्या अशी महत्त्वाची सूचना दिली आहे.
याशिवाय आणखी महत्त्वाची बाब म्हणजे मास्क लावणं, हात स्वच्छ ठेवणं आणि सोशल डिस्टन्सिंग कसं राहिल हे पाहणं म्हणजेच कोव्हिड प्रोटोकॉल पाळण्याचं नागरिकांना आवाहन करावं अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने फ्ल्यू किंवा इतर गंभीर आजारांच्या वाढत्या प्रसाराकडे लक्ष ठेवण्याच्या सूचनाही राज्यांना दिल्या आहेत. सगळ्या राज्यांनी कोव्हिड १९ संदर्भातली तयारी करून ठेवा आणि आरोग्य विषयक तयारी सुसज्ज ठेवा अशाही सूचना दिल्या आहेत. आपण आजवर करोनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. जर करोनाची चौथी लाट आली तर त्या लाटेला तोंड देण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलावीत असंही केंद्र सरकारने सुचवलं आहे.
रूग्णालयांना ड्राय रन करण्याच्या सूचना
राज्यांच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कोव्हिड नियमांच्या अंतर्गत आरटी पीसीआर आणि अँटीजन टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. करोनाचा BF 7 हा व्हेरिएंट जास्त प्रमाणात संक्रमण वाढवतो आहे. त्यानुसार जर या व्हेरिएंटची लागण झालेला रूग्ण आढळला तर काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जास्तीत जास्त केसेसमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग केलं जावं असे निर्देशही दिले आहेत.
रूग्णालयांनी समोर येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार रहावं. आपल्या रूग्णालयात रूग्ण आले तर काय करायचं याचा ड्राय रन म्हणजेच सरावही करावा असंही केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांमध्ये सुचवण्यात आलं आहे.
राज्यांनी लसीकरण वाढावं यासाठी पुढाकार घ्यावा. तसंच ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांनी बूस्टर डोस घ्यावा यासाठी जनजागृती मोहीम राज्यांनी सुरू करावी अशीही एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.
नव्या वर्षाच्या स्वागताच्या दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने इव्हेंट ऑर्गनायझर्स, व्यापारी संघटना, बिझनेस ऑनर्स यांनाही सुचित करावं की एका ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी होणार नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आणखी काय म्हटलंय?
मनसुख मांडवीय यांनी आज झालेल्या बैठकीनंतर हे म्हटलं आहे की जगातल्या काही देशांमध्ये करोनाचे रूग्ण वाढत आहेत. भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं टेस्टिंग आवश्यक आहे. जर गरज वाटली तर विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोव्हिड टेस्ट अनिवार्य केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी करोनाविषयी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. देशात करोनाची स्थिती काय आहे त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. करोना अद्याप संपलेला नाही त्या अनुषंगाने आम्ही आज तज्ज्ञांशी चर्चा केली या आशयाचं ट्विट या बैठकीनंतर मनसुख मांडवीय यांनी केलं होतं.