न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने घेतला गळफास ; धक्कादायक घटनेनं खळबळ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ब्रम्हपुरी शहरातील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या गेटवर एका तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
ही घटना मंगळवारी (6 डिसेंबर) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पौर्णिमा मिलिंद लाडे (वय २७ ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे.
पौर्णिमा ही गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) येथील रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी शहरात न्यायालयाच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. सोमवारी रात्री बांधकाम करणारे कामगार कामावरून घरी गेले. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना न्यायालयाच्या गेटवरच तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी तरुणीचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे.