अखेर रामदेव बाबांनी मागितली माफी ; राज्य महिला आयोगाकडे केला खुलासा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- जाहीर कार्यक्रमात महिलांच्या वस्त्रासंबंधी अनुदार उद्गार काढल्याबद्दल बाबा रामदेव यांनी माफी मागितली असून आपल्याला महिलांची साधी वस्त्रे असा उल्लेख करायचा होता असे त्यांनी म्हटले आहे.
बाबा रामदेव यांनी महिलांसंबंधी अनुदार उद्गार काढल्यावर राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. त्याला बाबा रामदेव यांनी उत्तर पाठवले आहे. वरील उदगारांबद्दल आपल्याला खेद वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आपण महिला आयोगाच्या नियमानुसार कोणताही गुन्हा केला नाही. आपण जागतिक स्तरावरही महिला सबलीकरणासाठी काम केले आहे. तसेच महिलांना समाजात समानतेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनांनाही आपण नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. तसेच देशात महिला सक्षमीकरणासाठी अनेक संघटनांबरोबरही एकत्र कामही केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्या कार्यक्रमातही महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. हा कार्यक्रम महिला सबलीकरणाशी संबंधित होता. त्यात मी केलेल्या भाषणातील काही सेकंदांची क्लिपिंग समाजमाध्यमांमध्ये फिरवून त्याद्वारे मी उच्चारलेल्या शब्दांना चुकीचा अर्थ दिला जात आहे. आपण सदैव आई आणि मातृशक्तीचा गौरवच केला आहे. मी माझ्या त्या एका तासाच्या भाषणातही मातृशक्तीचा गौरवच केला होता. त्यात त्यानंतर महिलांच्या वस्त्रासंबंधीही मी बोललो. मात्र माझ्या बोलण्याचे तात्पर्य महिलांच्या साध्या वस्त्रांशी होते. तरीही मी कोणाच्याही भावनांना दुखावले असेल तर मला त्याबद्दल मनःपूर्वक वाईट वाटते. मी ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्या सर्वांची मी क्षमा मागतो असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.