उद्धव ठाकरे यांची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाणा :- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या (शनिवार) बुलढाण्यात धडाडणार आहे. बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार असून त्यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बुलढाण्यातील चिखली येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शिवसेनेने शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. दुपारी 3 वाजता हा मेळावा सुरू होणार असून या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. यावेळी शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ, सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यास होत असलेला विलंब या कळीच्या मुद्यांवरून उद्धव ठाकरे मिंधे सरकारवर आसुड ओढण्याची शक्यता आहे.
कोश्यारी आणि गद्दारांचा समाचार घेणार!
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सँपल महाराष्ट्रातून परत घ्या, अशी ठाम मागणी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंद किंवा विराट मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यावर चिखलीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणती हाक देतात, याकडेही शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.
विदर्भातील बुलढाणा हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिह्यात खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड आणि संजय रायमूलकर या तिघांनी गद्दारी केली असून ते मिंधे गटात गेले आहेत. या गद्दारांना कोणत्या शब्दांत उद्धव ठाकरे फोडून काढतात, याचीही शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे.
मिंध्यांना सभेचा धसका, लादल्या जाचक अटी!
उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती मेळाव्याचा मिंधे सरकारने धसका घेतला आहे. त्यामुळेच या मेळाव्याला परवानगी देताना पोलिसांनी जाचक अटी घातल्या आहेत. मेळाव्यात ‘बाळासाहेब ठाकरे अमर रहे’ आणि ‘उद्धव ठाकरे आगे बढो’ या दोनच घोषणा द्याव्यात, मशाल पेटवण्यासाठी स्फोटक वा ज्वलनशील पदार्थ बाळगू नये, सभास्थळी कोणाच्याही भावना दुखावतील असे फलक लावू नयेत, भाषणात कोणतीही व्यक्ती, जाती-धर्माच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा अटी पोलिसांनी घातल्या आहेत.