…तर मी विरोधकांसोबत जाणार, राजू शेट्टींनी सांगितलं मनातलं…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदनगर :- राज्यात यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. परंतु परतीच्या पावसाने ऊस तोडण्या जोमाने सुरू होण्यास अजून अवधी असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान मागच्या कित्येक वर्षांपासून माजी खासदार राजू शेट्टी ऊस आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देत आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह आता राजू शेट्टी यांनी अहमदनगरमध्येही ऊस परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत शेतकऱ्यांच्या मालाल भाव मिळवून देण्याची मागणी केली.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या टाकळीमियाँ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परीषद संपन्न झाली. यावेळी शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारसह विरोधकांवरही निशाणा साधला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजू शेट्टी हे राज्यभरात ऊस परिषदा घेत आहेत. राहुरी येथील परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी यांनी विविध मागण्या केल्या.
यावेळी शेट्टी म्हणाले की, मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी पेक्षा दोनशे रूपये जास्त दर साखर कारखानदारांनी दिले पाहिजेत. तसेच यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देत हंगाम संपल्यानंतर 350 रूपये द्यावेत अशी मागणी राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केली.
साखर आयुक्तालयावर मोर्चा
साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात असा आरोप राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर केला. राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत, सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे आणि यासंदर्भात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येत्या 7 तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार आहे. सरकारने गांभिर्याने लक्ष दिले नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिलाय.
मुकादमांकडून शेतकऱ्यांची लूट थांबली पाहीजे
मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याने मुकादम व्यवस्था संपवावी आणि बांधकाम मजुरांप्रमाणे महामंडळाने ऊस तोडणी मजूर पुरवावेत. मुकादम कारखाना आणि शेतकऱ्यांची देखील फसवणूक करतात यामुळे सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे होत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांचही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष नाही. सत्ताधारी भांडणातच मशगुल आहेत त्यामुळे आता शेचकऱ्यांनीच ठरवाव चोरांच्या मागे जावे की नाही टीका राजू शेट्टी यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर केलीये. तसेच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, यांना काय सत्तेचा सारीपाट मांडायचा ते मांडू द्या. मात्र शेतकऱ्यांना आज संघर्षाची गरज आहे आणि त्या लढाईत मी उतरलोय.
तर आम्ही विरोधकांसोबत येऊ
साखरेच्या एफआरपी बाबत केंद्राकडून कोटा पद्धत लागू होवो अथवा काही होवो मात्र शेतकऱ्यांचे पैसे द्या. केंद्रा बरोबर काय भांडायच ते भांडा, आम्ही देखील सोबत येऊ असा टोला राजू शेट्टी यांनी विरोधकांना लागवलाय.
गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच शेतकऱ्यांबद्दल सरकारची एव्हढी असंवेदनशीलता आणि बेजबाबदारपणा पाहतोय. सवंग लोकप्रियतेसाठी नुसत्या घोषणा सुरू असून सरकारला लाज वाटली पाहीजे अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.