शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस ते ब्रीच कँडीत उपचार घेणार असून, 2 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
त्यामुळे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या प्रकृतीविषयीची माहिती देण्यात आली आहे. शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार पुढील तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत. ते ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतील. येत्या 2 नोव्हेंबर रोजी त्यांना संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
शरद पवार तीन दिवसात कुटुंबा व्यतिरिक्त कुणालाही भेटणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी ते शिर्डीत येणार आहेत. तसेच पक्षाच्या 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबीराला ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे आवाहनही पक्षाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, मागील वर्षी मार्च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास झाला होता. शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती.