बच्चु कडू-रवी राणा वाद चिघळला ; माफी मागा अन्यथा……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात शाब्दिक चकमकी सुरु आहेत. आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही गटांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
आमदार रवी राणा हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा बच्चु कडू यांच्याकडून करण्यात येत आहे. दोघांमधील वाद शिगेला पोहचलेला असताना आता सोलापुरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
सोलापुरात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चक्क आमदार रवी राणा यांच्या प्रतिमेचे तिरडीच काढत निषेध नोंदवला आहे. इतकेच नव्हे तर रवी राणांनी वेळीच बच्चू कडूंची जाहीर माफी मागितली नाही तर येत्या १ नोव्हेंबरला अमरावतीमध्ये जाऊन रवी राणा यांचा पुतळा जाळू असा इशारा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला.
दरम्यान, शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) रवी राणांच्या फोटोला प्रहार संघटनेच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. बच्चू कडू यांच्यार रवी राणा यांनी बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी मलकापूर येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात रवि राणा यांचा फोटो असलेल्या बॅनरला ‘जोडे मारो’ आंदोलन करीत त्यांचा निषेध करण्यात आला.
रवी राणांनी बच्चू कडू यांच्याबद्दल चुकीचे व कोणताही आधार नसलेले खोटे आरोप केले. गरळ ओकून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. याचवेळी मलकापूर येथील तहसील चौकात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रवी राणांच्या फोटोला चपलांचा हार घालून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.