मुंबईत भाजपच्या अल्पसंख्यक महिला प्रदेश अध्यक्ष सुलताना खान यांच्यावर जीवघेणा हल्ला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 18 जुलै :- भाजपच्या अल्पसंख्यक महिला प्रदेश अध्यक्ष सुलताना खान यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मुंबईनजीकच्या मीरारोड परिसरात ही घटना घडली आहे. काल रात्री दोन व्यक्तींनी सुलताना यांच्यावर हल्ला केला, ज्यात त्या जखमी झाल्या आहेत.
सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुलताना खान या आपल्या पतीसह डॉक्टरांना भेटण्यासाठी जात होत्या. आपल्या पतीसह गाडीत असताना अचानक दोन अज्ञात व्यक्ती बाईकवर आल्या आणि त्यांच्या गाडी समोर बाईक उभी केली. दोन्ही हल्लेखोरांनी सुलतान खान यांना आधी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या गाडीची काच फोडून हल्लेखोरांनी हल्ला केला. आणि काही वेळातच तिथून पसार झाले.
या हल्ल्यात सुलताना खान जखमी झाली.
मात्र हल्ला होताच त्यांच्या पतीने आरडाओरडा सुरु केला. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले. त्यामुळे हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलीस तेथे दाखल झाले.
पोलिसांच्या मदतीने जखमी सुलताना खान यांना जवळच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सुलताना यांच्या हातावर दोन जखमा होत्या, त्यावर 3 टाके टाकून पुढील उपचार सुरू केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर भाजप नेत्या सुलताना या खूपच घाबरल्या आहेत. घडलेला प्रकार सांगण्याच्या स्थितीत देखील त्या नाहीत. मात्र हल्ला नेमका कुणी केला, हल्लेखोर कोण आहे हे स्पष्ट झालेले नाही. तर हा आपल्या पक्षाचा अंतर्गत मुद्दाही असू शकतो, अशी शंका सुलताना यांच्या पतीने व्यक्त केली आहे.