नामांतराचा निर्णय उद्धव ठाकरेंचा ; आमच्या पक्षाला कोणतीही विचारणा….. ; शरद पवारांचा खुलासा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- शिंदे गटानं बंड करत सुरत गाठल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराचा प्रस्ताव तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केला. राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या या मोठ्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं कौतुक देखील करण्यात आलं.
मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नामांतराच्या निर्णयाबद्द्ल खळबळजनक खुलासे केले आहे. नामांतराचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मांडण्यापूर्वी आमच्या पक्षाशी कोणतीही विचारणा झाली नसल्याचा खुलासा शरद पवारांनी केला आहे.
औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी नामांतराच्या निर्णयासंदर्भातील गौप्यस्फोट केले आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतर करण्यापूर्वी आमच्या पक्षाशी कोणतीही सल्लामसलत करण्यात आली नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याचा प्रस्ताव शेवटच्या क्षणी मांडण्यात आला असून यापूर्वी आमच्या पक्षाचा सल्ला घेण्यात आला नव्हता. नामांतर हा सरकारचा अजेंडा नव्हता तर मुख्यमंत्रांचा अंतिम निर्णय होता, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, नामांतराचा निर्णय हा उद्धव ठाकरेंनी पद सोडण्यापूर्वी घेतलेला शेवटचा कार्यकारी निर्णय होता.