अजित पवार-नितीन राऊत यांच्यात जोरदार खडाजंगी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याने नाराजीनाट्य समोर आले.
विशेषतः, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत एकमेकांना भिडले.
अजित पवार यांनी आपल्या विभागाच्या फाईल्स रोखल्याचा आक्षेप राऊत यांनी घेतला. त्याला अजित पवार यांनीही प्रत्युत्तर दिले. तुमची एकेक फाईल 20 ते 25 हजार कोटींची असताना ती कशी मंजूर करू? असा सवाल त्यांनी केला. एवढ्या मोठ्या खर्च आणि तरतुदींवर संपूर्ण चर्चा झाल्याशिवाय फाईल मंजूर करायच्या का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी राऊत यांना केला. दरम्यान, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि पुणेच्या नामांतराचे प्रस्ताव मांडत मंत्र्यांनी आग्रही भूमिका घेतल्याने अजित पवार भडकल्याचे समजते. ही मंत्रिमंडळ बैठक आहे.
सहकारी संस्थेची बैठक नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. ‘संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’च्या मागणीला मान्यता मिळाल्यानंतर काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांनी पुण्याचे नामांतर ‘जिजाऊनगर’ असे करा, अशी मागणी केली. यावर ‘जिजाऊनगर’ असे नामांतर करण्यास विरोध नाही; पण आम्हा पुण्याच्या मंत्र्यांना तरी विचारून प्रस्ताव आणा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेस विरोध करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती; पण छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाला विरोध करायचा नाही, अशी भूमिका आधीच काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही विरोधाशिवाय हा प्रस्ताव मंजूर झाला…