नवाब मलिकांना न्यायालयाच्या दणका ; तुरुंगातील मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक यांना सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे.
यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यामुळे मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी दोन आठवडे वाढला आहे.
गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी मलिक यांनी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे ‘टेरर फंडिंग` असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. ईडीने अटक केल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडताना मलिक यांनी `नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे` अशी प्रतिक्रिया दिली होती. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मागील सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांच्या तीन मागण्या मान्य केल्या होत्या. न्यायालयीन कोठडीत बेड, गादी आणि खुर्ची देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याआधीही मलिक यांच्या तीन मागण्या न्यायालयाने मान्य केल्या होत्या. ईडीच्या कोठडीत असताना घरचे जेवण मिळावे, चौकशीदरम्यान आपल्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी आणि रोजची औषधे घेऊ द्यावीत, अशा तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. या तिन्ही मागण्यांना न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता.
दरम्यान, ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण 22 वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली होती. यामुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिक हे न्यायालयीन कोठडीत असून, त्यांना आता सुटकेसाठी रीतसर जामिनासाठी अर्ज करावा लागेल.