योगी “माजी मुख्यमंत्री” होतील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
डुमरियागंज: ”उत्तर प्रदेशातील जनतेला भाजपने विकासाची स्वप्ने दाखविली. मात्र ती स्वप्नेच राहिली. प्रत्यक्षात विकास झालाच नाही. निवडणूक झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे माजी मुख्यमंत्री होतील,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज केले.
उत्तर प्रदेश निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे येथे आले होते. त्यावेळी प्रचारसभेत त्यांनी केंद्र व राज्यसरकारवर कडाडून टीका केली.
उत्तर प्रदेशात जनतेने भाजपला प्रचंड बहुमत दिले होते. परंतु, त्याचा वापर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी झाला नाही, अशी टीका करून आदित्य ठाकरे म्हणाले, “निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारकडून राजकीय कट रचला जात आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आहेत आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत.“
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान मजुरांच्या आपापल्या राज्यात परतण्याच्या तिकिटाचे पैसेही मुख्यमंत्री रिलिफ फंडातून दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
`ईस्ट इंडिया कंपनी` जाईल
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचा उल्लेख ईस्ट इंडिया कंपनी असा केला. ते म्हणाले, राज्यातील ही ईस्ट इंडिया कंपनी दहा मार्च नंतर येथे दिसणार नाही. परिवर्तनाचे हे वातावरण असेच राहिले तर २०२४मध्ये ही ईस्ट इंडिया कंपनी दिल्लीतूनही पळून जाईल. शिवसेनेने द्वेषाचे राजकारण कधी केले नाही. आमच्या हातात भगवा ध्वज आहे. परंतु, आमच्याबरोबर हिंदू, शीख, मुस्लीम, ख्रिश्चन असे सर्वजण आहेत.