दिव्यांग महिलांना स्वयंरोजगारासाठी इलेक्ट्रिकल ट्रायसायकल वाटप योजना ही महाराष्ट्रासाठी पथदर्शी योजना ठरेल :- पालकमंत्री संदिपान भुमरे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 14 फेब्रुवारी :- जिल्ह्यात नाविण्यपुर्ण योजनेतून दिव्यांग महिलांना स्वयंरोजगारासाठी इलेक्ट्रिकल ट्रायसायकल देण्याची योजना ही राज्यात सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याचा उपयोग दिव्यांग महिलांना स्वयंरोजगारासाठी करता येणार असून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी वाहन म्हणून देखील या ट्रायसिकलचा उपयोग करता येणार आहे. नाविण्यापुर्ण योजनेतून अशा प्रकारची यवतमाळची ही पथदर्शी योजना सर्व जिल्ह्यांनी राबवावी म्हणून आपण प्रयत्न करू असे प्रतिपादन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, यवतमाळ द्वारा नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत दिव्यांग महिला व तिच्या कुटुंबातील सदस्यांना स्वयंरोजगारासाठी यवतमाळ येथे आज पालकमंत्री यांच्या हस्ते 20 इलेक्ट्रिकल ट्रायसायकल चे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, माविम चे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर इलेक्ट्रिकल ट्रायसायकलचा फिरते विक्री केंद्र म्हणून स्वयंरोजगारसाठी वापर करता येणार आहे. दिव्यांग महिला व तिच्या कुटुंबातील सदस्य हे त्या ट्रायसायकलवर स्टेशनरी, भाजीपाला विक्री, टी स्टॉल, रेडीमेट गारमेंट, डेलीनीड्स, किराणा इत्यादी व्यवसाय करून स्वतः अत्मानिर्माभर होण्याच्या दिशेने वाटचाल करतील असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला.
या उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यात 885 ट्रायसायकल वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. योजनेबाबतची माहिती रंजन वानखेडे यांनी प्रास्ताविकेतून दिली.
कार्यक्रमाला संबंधीत अधिकरी उपस्थित होते.