पारधी वस्त्यांवर सर्व पायाभूत सुविधा निर्माण करा :- पालकमंत्री संदिपान भुमरे ; प्रत्येक तालुका आणि ग्रामपंचायतमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका तयार करा जिल्हा वार्षिक योजना व खनिज प्रतिष्ठान निधीच्या खर्चाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 14 फेब्रुवारी :- समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी उपयोगात आणला पाहिजे. जिल्ह्यातील सर्व पारधी वस्त्या आणि तांड्यावर रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, क्रीडांगण, आश्रमशाळा, अशा सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देऊन जिल्हा वार्षिक योजनेतुन तसे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिलेत.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना आणि खनिज प्रतिष्ठान निधीच्या खर्चाचा आढावा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज नियोजन भवन येथे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, पुसदचे आदिवासी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी श्री. शिरसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकार सिंग भोंड उपस्थित होते.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढण्यासाठी जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेसाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या ए. पी. जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या धर्तीवर तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा अशाच अभ्यासिका तयार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्यात. तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर जागा शोधून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासही त्यांनी सांगितले.
जंगलाला लागून असलेल्या शेतीत वन्यप्राण्यामुळे शेतातील पिकांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी वन विभाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा देतो. परंतु दरवर्षीचे असे नुकसान टाळण्यासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतीला सौर कुंपण देण्याची योजना राबवा. जिल्ह्यात असे किती क्षेत्र आहे त्याचा आराखडा तयार करून यावर्षी प्रायोगिक स्तरावर ही योजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिलेत.
अद्याप ज्या विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केले नाहीत त्यांनी आजच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री भुमरे यांनी दिल्यात.
जिल्हा वार्षिक योजना 2021-22 सर्वसाधारण योजने अंतर्गत 325 कोटीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 240 कोटीच्या प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरू झाली आहेत. परंतु सर्व कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्यावर कटाक्षाने भर दयावा. ज्या विभागाकडून निधी खर्च होऊ शकत नाही त्यांनी सदर निधी तात्काळ समर्पित करावा, जेणेकरून तो निधी परत न जाता वेळेत दुसऱ्या कामासाठी वापरता येईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खनिज प्रतिष्ठाण निधीचा आढावा घेताना पालकमंत्री भुमरे यांनी दोन वर्षांपासून प्रशासकीय मान्यता मिळूनही निधी खर्च न करणाऱ्या आणि काम पूर्ण न करणाऱ्या विभागांविषयी नाराजी व्यक्त केली. जिल्हा वार्षिक योजनेप्रमाणे खनिज प्रतिष्ठाण निधी खर्च करण्यासाठी एक वर्षाची कालमर्यादा ठरविण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. पाणी पुरवठा योजनेतील जी कामे जलजीवन मिशनमध्ये करणे शक्य आहे त्यासाठी खनिजचा निधी खर्च करू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.