आगामी लोकसभा निवडणुका शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढणार :- संजय राऊत यांचे वक्तव्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना आगामी लोकसभा निवडणुका पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली लढणार आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका शिवसेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात लढेल. त्यासोबतच संजय राऊतांनी उत्तर प्रदेशम विधानसभा निवडणुकांबाबतही वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करुन सरकार स्थापन करतील. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही आत्ताच गोव्याहून परतलो आहोत. लवकरच आदित्य ठाकरेंसोबत उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहोत. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात आम्ही देशभरात लोकसभा निवडणुका लढवणार आहोत. ज्याची तयारी सध्या पक्ष करत आहे.
हिमंत बिस्वा यांच्या वक्तव्याचा आक्षेप
शिवसेना खासदार संजय राऊतांनी आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं संपूर्ण जीवन काँग्रेसमध्ये घालवलं. त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांच्याबाबत असं वक्तव्य करणं योग्य नाही. त्यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत काम केलं होतं. तुम्हाला घडवण्यात त्यांचाही हातभार असल्यानं त्यांच्या माजी नेत्याच्या विरोधात कोणीही अशी वक्तव्य करू नयेत.”
हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी राहुल गांधींना ‘आधुनिक जिना’ म्हटलं होतं. शुक्रवारी उत्तराखंडमधील निवडणूक रॅलीदरम्यान माजी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षांवर टीका करताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुलगा’ असल्याचा पुरावा भाजपनं कधी मागितला होता का? असा प्रश्न विचारला होता.
नेमकं काय म्हणाले हिमंत बिस्वा सरमा….?
राहुल गांधी तुम्ही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहात. आम्ही तुमच्याकडे तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा कधी मागितला आहे का? लष्कराने जर सांगितलं आहे की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला आहे तर तो त्यांनी केलाच आहे. त्याचे पुरावे कसले मागता? लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का, असा सवालही त्यांनी केला होता. तुमचा बिपिन रावत यांच्यावर विश्वास नाही का? तुम्हाला पुरावा का हवा आहे? सैनिकांचा अपमान करणे बंद करा असे ते म्हणाले होते.