धक्काबुक्कीनंतर सोमय्याचं पहिलं ट्वीट ; म्हणाले “माझ्यावर शिवसेनेच्या गुंडानी हल्ला केला….”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुणे महापालिकेमध्ये आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली. सोमय्या महापालिकेत आले असता त्यांना निवेदन देण्यासाठी काही शिवसैनिक त्याठिकाणी आले होते.
त्यावेळीच ही घटना घडली. धक्काबुक्कीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून यामध्ये धक्काबुक्कीमुळे सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवरून खाली कोसळल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर सोमय्या यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आले आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर याबाबतची माहिती स्वतः सोमय्या यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. याबाबत माहिती देताना सोमय्या यांनी, ‘शिवसेनेच्या गुंडांनी आज माझ्यावर पुणे माहापालिकेमध्ये हल्ला केला.’ अशी माहिती दिली.
या प्रकरणानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेचा निषेध करताना, ‘आम्ही जशास तसे उत्तर देऊ’ असा इशारा दिला. सोमय्या यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून येथे त्यांच्या विविध चाचण्या करण्यात येत आहेत, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.