प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारात महाराष्ट्राचा झेंडा ; विजेत्यांमध्ये राज्यातील तीन मुलांचा समावेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(सोमवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP Awareeds ) वितरण केलंय. डिजिटल सर्टिफिकेट आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांनी मुलांना बक्षिसाची रक्कम सुपूर्द केली आहे.
अभिनव तंत्रज्ञान, समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य या सहा क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ साठी बाल शक्ती पुरस्काराच्या विविध विभागाअंतर्गत देशभरातील २९ मुलांची निवड करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व बाल विजेतांच्या खात्यावर एक लाख रूपयांचे रोख बक्षीस दिले आहे. यावेळी त्यांनी मुलांना संबोधित केलंय. तुम्हा सर्वांशी संवाद साधून खूप छान वाटले असे ते म्हणाले. मलाही तुमच्याकडून तुमचे अनुभव कळले, असं नरेंद्र मोदी म्हणाले. भारतातील युवक नवनवी अभिनव संशोधने करत आहेत आणि देशाला स्टार्टअप्सच्या जगात अधिक उंचीवर घेऊन जात आहेत. हे पाहून आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो, असं देखील मोदी म्हणाले.
विजेत्यांमध्ये राज्यातील तीन मुलांचा समावेश
वर्ष २०२२ साठीच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन मुलांचा समावेश आहे. अतुलनीय धाडस केल्यामुळे शिवांगी काळे, नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रातील कामगिरीत जुई अभिजित केसकर आणि क्रीडाक्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल स्वयम पाटीलला गौरविण्यात आले आहे.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार
५ ते १८ वर्षांपर्यंतच्या भारतात राहणाऱ्या मुलांना नवोन्मेष, शैक्षणिक कामगिरी, क्रीडा, कला,संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. तसेच बालकांची अतुलनीय कामगिरी आणि अद्वितीय क्षमतांची दखल घेत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले जातात.
ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रथमच ब्लॉक चेन या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ब्लॉक हा ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील अनेक डेटा ब्लॉक्सचा संदर्भ देतो. याद्वारे डेटा वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये संग्रहित केला जातो. तसेत ते ऐकमेकांशी जोडलेले असतात. यामुळे नवीन डेटाची लांब साखळी तयार होऊन तो नवीन ब्लॉकमध्ये संग्रहित केला जातो.