नाथूराम गोडसेंच्या भूमिकेमुळे खा.कोल्हे नव्या वादात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे नव्या वादात सापडले आहेत.
त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे.
याबद्दल पत्रकारांशी बोलताना कोल्हे म्हणाले, मी २०१४ ते २०१६ या कालावधीत शिवसेनेमध्ये सक्रिय होतो. नंतर तेथूनही मी दूर झालो. २०१९ मध्ये मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. मधल्या काळात म्हणजे २०१७ मध्ये मी हा सिनेमा केला होता. तो सिनेमा प्रदर्शित होणार की नाही, असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून होता. अचानक तो चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे मला कळाले.
मी आजपर्यंत कधीही गांधी हत्येचे समर्थन केलेले नाही, तसेच नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरणही मी कधी केले नाही. मात्र, एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करायला मिळणे याचा अर्थ आपण तसे आहोत, असा होत नाही.
मी जर एखाद्या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली, तर मी खऱ्या आयुष्यात खलनायक होतो का? वैचारिकदृष्ट्या आपण जी भूमिका करतो, त्याच्याशी आपण सहमत असतोच असे नाही. उद्या जर माझ्या पक्षाने या चित्रपटाला विरोध केला, तर मला त्याचे वाईट वाटणार नाही, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही, असा जुनाच विचार मला यानिमित्ताने आठवत आहे. या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तरी त्यातील सकारात्मक गोष्ट जाणवते, ती म्हणजे खरे आयुष्य आणि चित्रपटातील आयुष्य यात सीमारेषा अधोरेखित केली पाहिजे.
कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचार स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. विनाकारण विविध गोष्टींची गल्लत करून राजकारण करणे म्हणजेच दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. भूमिका पटत नसेल त्यांनी स्वतःची भूमिका ठामपणे मांडणारे चित्रपट काढावेत. पुस्तक लिहावे; पण विनाकारण नको ते वाद उभे करू नयेत, असे आपल्याला वाटते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही भूमिका करण्याआधी मी शरद पवार यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, मी अभिनेता म्हणून ती भूमिका स्वीकारली तेव्हा मी राष्ट्रवादी पक्षाचा सदस्यही नव्हतो.
– अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस