अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीनीकरणावरुन राजकारण तापले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली : दिल्लीतील सुप्रसिद्ध अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून राजधानीत राजकारण तापले असून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन करण्यास विरोध दर्शवला आहे.
त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे
मात्र, या संदर्भात केंद्र सरकारने खुलासा केला असून अमर जवान ज्योती कायमची मालविण्यात येणार नाही, तर ती फक्त राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन करण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकारला देशभक्ती आणि देशासाठी सैनिकांनी केलेला त्याग मान्य नाही. त्यांना इतिहासाचे पुनर्लेखन करायचे आहे. म्हणूनच अमर जवान ज्योती मालविण्याचा यांचा प्रयत्न आहे, असा आरोप राहुल गांधींनी या ट्विट मधून केला आहे.
प्रत्यक्षात अमर जवान ज्योती मालविण्यात येणार नसून ती फक्त राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन करण्यात येणार आहे. अमर जवान ज्योती ब्रिटिशांनी बांधलेल्या ब्रिटिश सैनिकांच्या युद्ध स्मारकामध्ये प्रज्वलित करण्यात येते. पहिल्या महायुद्धात जे ब्रिटीश सैनिक वीरगती प्राप्त झाले त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक बांधण्यात आले होते. 1971 च्या युद्धानंतर त्यामध्ये काही सुधारणा करण्यात येऊन अमर जवान ज्योती प्रज्वलित करण्यात आली. परंतु त्या युद्धातील जवानांची नावे तेथे अस्तित्वात नाहीत. केंद्र सरकारने 2014 नंतर बांधलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक सर्व शहिदांची नावे अस्तित्वात आहेत. त्यामुळे अमर जवान ज्योती ही राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन करण्यात येणार आहे, असा खुलासा सरकारतर्फे करण्यात आला आहे.