नगरपंचायतीची रणधुमाळी ; निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रातील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकीची दोन टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. राज्य निवडणूक आयोगानं ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानं ओबीसींच्या जागांशिवाय निवडणूक घेण्याचं ठरवलं होतं.
मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राखीव ठेवलेल्या जागांसाठी खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्या आदेशाप्रमाणं काल 95 नंगरपंचायती आणि भंडारा (Bhandara) आणि गोंदियातील (Gondia) जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील काही जागा, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलंय.सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील झाली आहे. राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची (Maharashtra Local Body Election Result) रणधुमाळी पाहायला मिळतेय. सातारा जिल्ह्यातील पाटण मध्ये शिवसेना नेते गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं आव्हान आहे.
कोरेगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेना आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये लढत होत आहे. सांगलीतील कवठेमहाकाळमध्ये रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. पुण्यातील देहूमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि भाजपच्या बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. रत्नागिरीमध्ये दापोली मंडणगडमध्ये शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी निवडणुकीची सूत्र हाताळली.
इथं राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होती. मात्र, शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. अहमदगरमध्ये कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. नाशिकच्या दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची लढत होत आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जळगावातील बोदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर, भंडारामध्ये जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.