बाराशे किलोमीटर पायी चालत आणले उंट ; ५ जणांवर गुन्हे दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- गुजरातमधून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पोलिस संरक्षणात रविवारी (ता. ९) धामणगाव येथून अमरावती येथे पाठविले आहे. आरोपींनी गुजरातमधून बाराशे किलोमीटर पायी चालत हे उंट आणले होते.
तळेगाव दशासरचे ठाणेदार अजय आकरे व हैदराबाद येथील अॅनिमल वेलफेअर संघटनेच्या सतर्कतेमुळे ५८ उंटांना जीवदान मिळाले आहे. या उंटांची किंमत सुमारे ५८ लाख सांगण्यात येते. या प्रकरणात आज एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
हैदराबाद येथील पशुसंरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून तळेगाव पोलिसांनी शनिवारी (ता. ८) उंट ताब्यात घेतले होते.उंटांच्या तस्करीमागे आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ५८ उंट हैदराबाद येथे आणल्या जात असल्याची माहिती हैदराबाद येथील पशुसंरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. चांदूररेल्वे तालुक्यातील निमगव्हाण गावानजीक पोलिसांनी उंट ताब्यात घेतले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी तळेगाव पोलिस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.
राजस्थान सरकारने उंट हा अतिसंरक्षित प्राणी घोषित केला आहे. त्याच्या संरक्षणासाठी राजस्थान सरकारने २०१५ मध्ये कायदा पारित केला. दरम्यान, कत्तलीसाठी तस्करी केली जाते, असा संशय व्यक्त केला जात आहे. एका उंटाची १५ ते २० हजारांत खरेदी केली जाते आणि कत्तलखान्यांना सुमारे एक लाख रुपयात विक्री केली जाते.फूड अॅण्ड सेफ्टी स्टँडर्ड अॅक्टनुसार उंटाचे मांस अखाद्य घोषित करण्यात आले आहे. भारतीय पशुकल्याण मंडळाने १४ ऑगस्ट २०१७ रोजी तसे परिपत्रकदेखील जारी केले आहे. तरीही देशाच्या काही भागांमध्ये उंटाचे मांस भक्षण केले जाते. त्याच्या कातडीचेही विविध उपयोग आहेत. त्यामुळे उंटांना मोठी मागणी आहे. या अवैध व्यवसायात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते
जसराज श्रीश्रीमाळ यांची महत्त्वाची भूमिका
हैदराबादचे प्राणिमित्र जसराज श्रीश्रीमाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत अमरावती व नंतर तळेगाव पोलिस ठाणे गाठले. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती कळविल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ व उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे उंट तळेगावचे ठाणेदार अजय आकरे यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले.
अॅनिमल वेलफेअर संघटनेने कत्तलीसाठी नेत असलेल्या ५८ उंटांची सुटका करून त्यांना रविवारी अमरावती येथील श्री. गोयनका यांच्या शेतात पाठविले आहे. या प्रकरणाचे नेमके सत्य काय, हे चौकशीनंतरच पुढे येईल :- अजय आकरे, ठाणेदार, तळेगाव दशासर