ग्राहकांच्या हक्काबाबत जाणीव जागृती साठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावे :- राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे मत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 24 डिसेंबर :- ग्राहक संरक्षक कायद्यानुसार प्रत्येक ग्राहकाला सुरक्षेचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, निवड करण्याचा हक्क, मत मांडण्याचा हक्क, तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क तसेच ग्राहक हक्काबाबत शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. ग्राहकांच्या या हक्काबाबत प्रशासनातर्फे नियमितपणे जाणीव जागृतीचे कार्यक्रम राबविले जातात, मात्र यासोबतच इतर सर्वच स्तरातून देखील ग्राहकांना त्यांचे हक्काबाबत माहिती व्हावी यासाठी प्रयत्न व्हावे, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन वेबिनारद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रमोदकुमार दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, ग्राहक तक्रार निवारणचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, ग्राहक मंचचे नारायण मेहरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने विविध कायदे केले आहेत. ग्राहकांना गुणवत्तापुर्ण सेवा देणे ही विक्रेत्याची जबाबदारी असली तरी ग्राहकांनी देखील कोणतेही व्यवहार करतांना सजग असावे असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
ग्राहक तक्रार निवारणचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे यांनी यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलतांना सांगितले की ग्राहक कायद्यामुळे ग्राहकांचे हित जोपासल्या जाऊ लागले आहे. ऑनलाईन व्यवहारात फसवणूक झाल्यास केवळ ट्रान्सेक्शनचा पुरवा दिल्यास मोठ्यात मोठ्या कंपनीविरूद्धही तक्रार नोंदवून कारवाई करता येते. ग्राहक तक्रार कक्षात तक्रार नोंदवून कमी खर्चात आणि वकीलाशिवाय दावा लढवता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले. सन 1986 साली 24 डिसेंबर रोजी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजूरी दिली होती, तेव्हापासून 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, वजन मापेचे सहाय्यक नियंत्रक गजानन ढाले, ग्राहक मंचचे नारायण मेहरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन छाया गुघाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी, ग्राहक चळवळीशी संबंधीत संस्था, दुकाणदार व नागरिक ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातून सहभागी झाले होते.