सिंदखेड पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांनी दिली महागावातील ३ गुन्ह्यांची कबुली # एटीएम चोरी, फुलसावंगी आणि आंबोडा येथील चोरीचा लागला छडा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत माहूर ते सारखणी रस्त्यावर वाहन अडवून सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल चोरट्यांना सिंदखेड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. महागाव येथील युनियन बँकेतील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, फुलसावंगी येथील सराफा दुकानातील चोरी, आणि आंबोडा येथील एका चोरीच्या घटनेत या चोरट्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. महागाव तालुक्यातील इतरही चोरीच्या घटनांत या सोनेरी टोळीचा हात आहे काय ? यासाठी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी महागाव पोलीस पोलिसांचे पथक आज सिंदखेड येथे गेले होते, मात्र माहूर व अन्य काही गुन्ह्यांचा तपास बाकी असल्याने आरोपींना महागाव पोलिसांकडे सोपविण्यात आले नाही.प्रकरणाची पृष्ठभूमि अशी की, २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता सारखणी ते माहूर रस्त्यावर पाच जणांचे टोळके सिंदखेड पोलिसांना संशयास्पद अवस्थेत आढळून आले.
या टोळक्यात विवेक किशन दामोदर रा. रामनगर बेलोरा ता. पुसद कपिल ज्ञानेश्वर मारकड रा.रामनगर बेलोरा ता. पुसद, अंकुश हनुमान हाके रा.धानोरा ता.पुसद, अजय वाघु जाधव रा.के.आर.के. कॉलनी आदीलाबाद आणि लखन लक्ष्मण राठोड राहणार लांजी, तालुका माहूर यांचा समावेश होता.त्यांना शिताफीने ताब्यात घेतले असता आरोपी कडे एक धारदार तलवार, २ जंबिया, २ लोखंडी रॉड, चाकू, मिरचीपूड, स्क्रू ड्रायव्हर. दोरी, लोखंडी चैन आणि एक इंडिका विस्टा गाडी असे साहित्य आढळले. रस्त्यावर दगड लाऊन सशस्त्र वाटमारी करण्याच्या तयारीत हे टोळके होते. दरम्यान न्यायालयाने लुटारूंना ४ दिवसांचा पीसीआर दिला. पोलिसांनी बाजीराव दाखवताच आरोपींनी अनेक गुन्ह्याची कबुली दिली. यात तीन आठवड्यांपूर्वी महागाव येथील युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली,
नांदेड जिल्ह्यातील सिंदखेड येथील पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केलेले धारधार शस्त्र आणि साहित्य
या शिवाय फुलसांगवी येथील सराफा दुकानातील चोरी आणि आंबोडा येथील एका चोरीची कबुलीही त्यांनी दिली आहे. महागाव पोलिसांचे पथक वरील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आज सिंदखेड येथे गेले होते परंतु माहूर येथील एका घटनेचा तपास अपुर्ण असल्याने आरोपींचा ताबा मिळू शकला नाही.
२० दरोडेखोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा होणार पर्दाफाश :
दरोड्याच्या प्रयत्नात असलेले पाच लुटारू सिंदखेड पोलिसांनी अटक केले. त्यानंतर या सोनेरी टोळी बाबत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. २० गुन्हेगारांची ही आंतरराज्य टोळी असून यातील मास्टर माइंड तेलंगणा राज्यातील असल्याचे कळते. दोन वेगवेगळ्या चारचाकी वाहनातून अनेक राज्यात चोऱ्या आणि दरोडे करण्यात ही टोळी पटाईत आहे. महागाव तालुक्यातील सेनद येथील एकाचा या टोळीत सहभाग असल्याची माहिती सिंदखेड येथील ठाणेदार तिडके यांनी दिली.