टीईटी परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन वर्षा गायकवाड यांची माहिती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक असलेला आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची (TET Exam) ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
पुणे सायबर विभागाच्या कार्यालयामध्ये ही चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता अनेक मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेळ्या परीक्षांमध्ये पेपर फोडणारे आणि घोटाळे करणारे रॅकेट समोर येत आहे. यासंदर्भातील तपासासाठी आता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. शिक्षण विभाग आता सतर्क झाला असून याबाबत कडक कारवाई करण्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज ट्विट करत दिले आहेत.
वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय की, टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
पुढे त्या म्हणाल्या की, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णाजी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी ह्या समितीद्वारे केली जाईल व अहवाल काही दिवसांतच सादर केला जाईल. कायदेशीर प्रक्रियेत आवश्यक ते सहकार्य शालेय शिक्षण विभागाकडून केले जाईल.
दरम्यान, म्हाडाच्या पेपरफूटी प्रकरणात पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख (रा. खराळवाडी, पिंपरी ), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) यांना अटक केली होती. त्याननंतर सायबर पोलिसांना संशयीत आरोपी डॉ. प्रितिश देशमुख याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 2020 मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेत अपात्र झालेल्या 40 हून अधिक विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे सापडली होती. तसेच डॉ. देशमुखच्या चौकशीमध्ये राज्य परीक्षा परिषदेच्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव पुढे आले होते. त्यानंतर संशयाची सुई राज्य परीक्षा परिषदेकडे वळली होती. दरम्यान सायबर पोलिसांनी सुपे यास गुरुवारी सकाळी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनंतर दिवसभर व रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सुपे यास पोलिसांनी अटक केली, त्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. सुपे याने शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन उमेदवारांना पास केल्याचा ठपका ठेवला आहे.