लैंगिक छळाच्या तक्रारी साठी कार्यालया अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक….
लैंगिक छळाच्या तक्रारी साठी कार्यालया अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 9 :- कामाचा ठिकाणी होणा-या महिलांच्या लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 व दिनांक 9 डिसेंबर 2013 रोजी नियम प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यामुळे विशाखा जजमेंटमधील तरतुदीनुसार निर्गमित शासन निर्णय अधिक्रमित होत असून या अधिनियमातील कलम 6 (1) अंतर्गत जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याची तरतुद आहे.
सदर अधिनियमांतर्गत दिलेली कार्य पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये निवासी उपजिल्हाधिकारी यांना जिल्हा अधिकारी म्हणून घोषित केले आहे. ज्या कार्यालयामध्ये 10 पेक्षा कमी अधिकारी, कर्मचारी असतील किंवा जेथे विभाग प्रमुखाविरुध्द तक्रारी आहेत. अशा कार्यालयातील लैंगिक छळाच्या तक्रारी जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीकडे करावयाच्या आहेत.
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळास प्रतिबंध कायद्यानुसार ज्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी यांचा समावेश असेल, अशा प्रत्येक नियोक्त्याने आपल्या आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करावयाची आहे. महिलांची कामाच्या ठिकाणावर होणारी लैंगिक छळवणूक विरोधी संरक्षणासाठी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था शाखा ज्यांची शासनाने स्थापन केली असेल, स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी किंवा नगरपरिषद किंवा सहकारी संस्था अशा सर्व आस्थापना तसेच कोणतेही खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम, संस्था, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इ. सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले इ. ठिकाणी किंवा अधिनियमात नमूद केलेल्या कामाच्या ठिकाणी तक्रार समिती गठित करावयाची आहे.
जर एखाद्या मालकाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही तर अधिनियमातील कलम नुसार कारवाई केली नाही. या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला 50 हजार रुपयापर्यंत दंड होईल तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास लायसन्स रद्द, दुप्पट दंड अशी तरतूद आहे. या अंतर्गत तक्रार समिती तात्काळ गठीत करून तसा अहवाल या कार्यालयास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय दुरध्वनी क्र. 07232-295022) जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नविन प्रशासकीय इमारत, यवतमाळ येथे त्वरीत सादर करावा तसेच ई-मेल – dwomenchild@yahoo.com मेल आयडीवर पाठविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.
००००००