” सतत पवारांसोबत राहून राऊतांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली “
” मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका कोरोनाच्या काळातच झाल्याचा विसर ”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच बिहारमध्ये करोना संपलाय का ? अशी विचारणा त्यांनी केली आहे. “सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की करोना संपला तर मग तसं जाहीर करा. हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
“सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे, कोरोनाच्या काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर त्यांनी तीर चालवले आहेत. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका करोनाच्या काळातच झाल्या होत्या याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.” असं म्हणत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून राऊतांवर निशाणा साधला.
काय म्हणाले होते राऊत ?
“निवडणूक लढण्यासंबंधी शिवेसना नक्की विचार करेल. पण देशात सध्या अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यांना हातावर फक्त काळी शाई लावून घ्यायची नाही. ऑनलाइन निवडणुकीमुळे गुप्तता टिकेल का ? याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं होतं.
“लालूप्रसाद यादव आज इस्पितळात आहेत. काँग्रेसचं तिथं फार अस्तित्व नाही. अशावेळी जनता दल युनायटेड आणि भाजपा एकतर्फी निवडणुका लढणार का? अशी लोकांच्या मनात शंका आहे. पण लोकशाहीत शंकांचा विचार न करता लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे. निवडणुका घाईघाईत होत नसून वेळेतच होत आहेत, मात्र सध्या निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती नाही,” असंही ते म्हणाले होते.