मोठी बातमी ! देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची मुंबईत भेट
महाराष्ट्राच्या राजकारणात बदलांची नांदी ?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी आपसात भेट घेतली आहे. दोन तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता समोर आली आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध आडाखे बांधले जात आहेत. मुंबईतील हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं समजतं आहे. तसंच या भेटीचे विविध अर्थही काढले जात आहेत. याबाबत प्रवीण दरेकर यांना विचारलं असता तूर्तास तरी ही भेट ही प्राथमिक स्तरावर होती असं त्यांनी म्हटलं आहे. टीव्ही नाईन मराठीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल आला खरंतर महायुतीच्या बाजूने आला होता. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद रंगला आणि शिवसेनेने फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं. तसंच तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी स्थापन झाली. ज्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात विस्तव जात नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेली भेट ही सूचक मानली जाते आहे. ही गुप्त भेट होती असं म्हटलं जातं आहे. या भेटीचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. पण आत्ताच या भेटीबाबत काही सांगता येणार नाही असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
“शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर पातळी सोडून टीका केली. शिवसेनेसोबत आम्ही फक्त राजकीय दृष्ट्या वेगळे झालेलो नाही तर मनानेही वेगळे झालो आहोत. त्यामुळे इतक्या सहजासहजी सत्तेसाठी ही बैठक असेल असं वाटत नाही. भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हे वाटणार नाही. शिवसेनेबाबत जाऊन सत्ता आणावी असं आम्हाला वाटत नाही” असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.