शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडूंची प्रहार संघटना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
या विलिनीकरणानंतर बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाईल, अशीदेखील शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर खुद्द बच्चू कडू किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणतीही अधिकृत भूमिका मांडली जात नव्हती. अखेर आज स्वत: बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. यात विलिनीकरणासाठी सकारात्मक असल्याचे सूतोवाच बच्चू कडूंनी दिले.
“एकनाथ शिंदेंनी जर मला उमेदवारी दिली तर…”
बच्चू कडूंनी यावेळी माध्यमांमधील चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “मलाही माहिती नव्हतं की मी विधानपरिषदेचा उमेदवार होऊ शकतो. उद्या मला विधानपरिषद उमेदवारी मिळाली, तर ती माध्यमांमुळे असेल. मी एका जातीचा किंवा धर्माचा माणूस नाही. मी शेतकरी-दिव्यांगांचं काम करणारा माणूस आहे. जर मला एकनाथ शिंदेंनी उमेदवारी दिली तर दिव्यांगांचा-मजुरांचा सन्मान होईल. आम्ही मुद्द्यांची लढाई लढणारी माणसं आहोत. आमचा जर विचार झाला, तर आमचे काही मुद्दे आहेत”, असं बच्चू कडू म्हणाले.
विलिनीकरणाची पूर्वअट म्हणून काय आहेत बच्चू कडूंचे मुद्दे?
यावेळी बच्चू कडूंनी विलिनीकरणाची पूर्वअट म्हणून काही मुद्दे मांडले. “दिव्यांगांच्या उर्वरीत मुद्द्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा मुद्दाही आहे. पदांसाठी युती करणारा बच्चू कडू नाही. इतर पक्ष तशा युती करतात. पण बच्चू कडू मुद्द्यांसाठी युती करेल. मुद्दे असतील, तरच आम्ही पुढचं पाऊल टाकू”, असं ते म्हणाले.
विलिनीकरणाच्या बातम्या वाचताना दु:ख झालं – बच्चू कडू
दरम्यान, शेतकरी मतदारांनी आपल्याला नाकारल्याची खंत यावेळी बच्चू कडूंनी बोलून दाखवली. “प्रहार ही कार्यकर्त्यांनी निर्माण केलेली संघटना आहे. विलीनीकरणाच्या बातम्या मी वाचत होतो तेव्हा मला दु:ख वाटत होतं. मी पूर्वी शिवसैनिकच होतो. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहारची निर्मिती झाली. आम्ही आजपर्यंत कुणाचाही पाठिंबा घेतला नाही. कायम तटस्थ भूमिका घेतली. प्रामाणिकपणे आणि तत्वाला धरून आम्ही काम केलं. फार लढलोय. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर आम्हाला शेतकऱ्यांकडून अपेक्षा होती की ते आम्हाला शाबासकी देतील. पण ते झालं नाही. आज जनतेपर्यंत जाणारा बच्चू कडू नेत्यापर्यंत का जातोय याचं कारणही जनताच आहे. आम्हाला विधानसभेत हार खावी लागली. एकंदरीत देशातलं राजकारण जात, धर्माच्या ताकदीवर चालतं. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागे राहावं लागतं”, अशा शब्दांत बच्चू कडूंनी आपली भूमिका मांडली.
एकनाथ शिंदेंशी भेट, सामंतांशी फोन कॉल
दरम्यान, शिवसेनेत विलिनीकरणासंदर्भात एकनाथ शिंदे व उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत बच्चू कडूंनी यावेळी माहिती दिली. “शिवसेनेकडून प्रस्तावाच्या चर्चा माध्यमांमधूनच माझ्यापर्यंत पोहोचल्या. एकदा एकनाथ शिंदेंशी ओघवती भेट झाली होती. उदय सामंतांशीही फोनवर थोडंफार बोलणं झालं होतं. पण त्यात काही स्पष्टता नव्हती”, असं बच्चू कडू म्हणाले.
“विलीनीकरणाचा प्रस्ताव स्वीकाराल का? – चर्चा व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. शिंदेंनी उमेदवारी दिली तर विधानपरिषदेत त्यांचे पाईक म्हणून काम करू, मेहनतीनं काम करू, शिवसेना किती वाढवायची त्यासाठीही प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या मुद्द्यासोबत जर मोठा पक्ष पाठिशी उभा राहात असेल तर त्यावर चर्चा होऊ शकते. पण चर्चेचा प्रस्ताव येतो की नाही ते पाहावं लागेल. निरोप आला तर भेटू आपण. भेटायला काय हरकत आहे?” असा मुद्दाही त्यांनी मांडला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..
उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!