माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी (ता. १२) सकाळी लातूर येथे निधन झाले. वाढत्या वयामुळे मागील काही काळापासून ते आजारी होते.
घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. तब्बल सात वेळा ते लातूरचे खासदार राहिले आहेत.
काँग्रेसचे एकनिष्ठ नेते, गांधी परिवाराचे जवळचे नेते, सोनिया गांधींचे विश्वासू म्हणून त्यांना ओळखले जात होते. लोकसभेचे अध्यक्षपद तसेच केंद्रीय गृहमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्रिपदे त्यांनी भूषविली. शिवराज पाटील यांनी पंजाबचेचे राज्यपाल पद देखील भूषवले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात लातूर ग्रामीण मतदारसंघातून झाली होती.
ते १९७३ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी झाले होते. पुढे त्यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. १९८० मध्ये ते प्रथम लोकसभेच्या मैदानात उतरले. आणि खासदार म्हणून विजयी झाले. सलग सात वेळा त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. २००४ ला मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया आणि राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवरांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पाटील यांचे दीर्घ सार्वजनिक जीवन देशसेवेसाठी समर्पित राहिले. लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल आणि खासदार या नात्याने त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. त्यांचे निधन दुःखदायी असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
शोक प्रस्ताव मंजूर
शिवराज पाटील यांनी देशाच्या राजकारणावर वेगळी छाप सोडली होती. अशा कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहोत, असे कॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीत पाटील यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे पक्षाचे खासदार के. सुरेश यांनी सांगितले. राज्य आणि केंद्रीय स्तरावर पाटील यांनी केलेले काम कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सुरेश यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….