महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! ‘शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न’; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आता जगाच्या नकाशावर आले आहेत,’ असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.
या १२ किल्ल्यांना मिळालं मानांकन
युनेस्कोच्या (UNESCO) यादीत सामाविष्ट झालेल्या किल्ल्यांमध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. यातील ११ किल्ले महाराष्ट्रात तर १ तामिळनाडूमध्ये आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘जगभरातील शिवप्रेमींना मी मनापासून शुभेच्छा देतो. हे मोठं यश मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विशेष प्रयत्न केले,’ असे फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, युनेस्कोकडे सात संस्था आपापले प्रस्ताव घेऊन गेल्या होत्या, पण पंतप्रधानांनी शिवकालीन किल्ल्यांना प्राधान्य देत हा निर्णय घ्यावा, यासाठी प्रयत्न केले.
एक वर्ष चाललेली प्रक्रिया
या मानांकनासाठी एक वर्षांहून अधिक काळ युनेस्कोसोबत सखोल संवाद सुरु होता. युनेस्कोचे अधिकारी प्रत्यक्ष किल्ल्यांना भेट देण्यासाठी आले होते. ‘किल्ल्यांची स्थापत्यशैली, दरवाजांची रचना, निसर्गाशी सुसंगत बांधकाम अशा सर्व बाबी युनेस्को समोर ठेवल्या,’ असं फडणवीस यांनी नमूद केलं.
२० देशांनी भारताच्या बाजूने केले मतदान
या मानांकनासाठी २० देशांनी मतदान केलं आणि सर्वांनी भारताच्या बाजूने मत दिलं. ‘परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव, आणि पंतप्रधान कार्यालयाच्या समन्वयाने आम्ही या देशांच्या राजदूतांशी संवाद साधला,’ अशी माहितीही त्यांनी दिली. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असताना त्यांनी देखील भारताला पाठिंबा देण्याची ग्वाही दिली होती.
पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना
युनेस्कोच्या या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ‘हे किल्ले आता जागतिक पर्यटन नकाशावर दिसणार आहेत आणि युनेस्कोच्या संकेतस्थळांवर त्यांची ऐतिहासिक माहिती उपलब्ध होईल,’ असं त्यांनी नमूद केलं.