पुढील 7 दिवस धोक्याचे ; आयएमडीकडून हाय अलर्ट….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या एक महिन्यांपासून देशातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. काही राज्यांमध्ये तर एवढा पाऊस झाला आहे, त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सतत पाऊस सुरू असल्यामुळे तापमान कमी झालं असून, लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. याचदरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आएमडीनं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील सहा दिवस अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 12 जुलै ते 17 जुलैदरम्यान अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. या राज्यांना हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मिरमध्ये पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये पुढील सात दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगनणा, आसाम, अरुणाचल प्रदेश सिक्किम, छत्तीसगड, मध्यप्रदेश, मेघालय आणि ओडिशामध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
पुढील सात दिवस महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी होतं, मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील ही कमी देखील पावसानं भरून काढली आहे, तर दुसरीकडे विदर्भात मात्र पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील सात दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.