राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडल्याची चर्चा, जयंत पाटलांना मोठी ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षातील पदावरून पाउतार झाल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे सोपवल्याची माहिती मिळत आहे.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होताच अजित पवार गटाने मोठी ऑफर जाहीर केली आहे. शरद पवार गटातून अजित पवार गटात आल्यास त्यांचं स्वागत करू, असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शनिवारी शरद पवारांकडे सोपवल्याची चर्चा सुरु होत आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार कोण स्वीकारणार, याकडे लक्ष लागलं आहे. येत्या १५ जुलै रोजी मंगळवारी शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे जयंत पाटील पक्षात कोणती भूमिका निभावणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान जयंत पाटील यांना अजित पवार गटाकडून मोठी ऑफर मिळाली आहे.
जयंत पाटील यांचं अजित पवार गटात स्वागत करू, असं अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. संग्राम जगताप म्हणाले की, ‘राष्ट्रवादीत ते अस्वस्थ आहेत, असं बोललं जायचं. अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. ते अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचं स्वागतच करतील’.
जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर अमर काळे काय म्हणाले?
दरम्यान,जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर खासदार अमर काळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अमर काळे म्हणाले, ‘जयंत पाटील यांच्या कार्यालयातून सुद्धा दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. परंतु आज जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. पंधरा तारखेला शरद पवार यांच्या नेतृत्वात असलेल्या बैठकीला पक्ष संघटनेच्या संदर्भात शरद पवार काय निर्णय घेतील हे कळेल. जयंत पाटील यांनी समर्थपणे राष्ट्रवादीची बाजू सांभाळली. पण निश्चितच काही वर्षात बदल करणे अपेक्षित असतो’.