दिग्रस शहरात कमिशनसाठी दोन नगरसेवक आमने – सामने “दोस्ती पक्की ;कमिशन अपना अपना”
पुरुषोत्तम कुडवे ९८२२८८७०६५
दिग्रस:
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रसपालिके अंतर्गत नगरसेवक यांच्या अधिनस्त प्रभागातील जनतेचे कल्याणकारी कामे करण्यासाठी व विकासात्मक कामे मार्गी लावण्याकरिता जनतेनी लोकसेवक म्हणून नगरसेवक यांना निवडून देतात. मात्र निवडणूक झाल्यानंतर पालिकेत गेल्यावर होणाऱ्या विकास कामातून टक्केवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. अनेक विकास कामातून कमिशन मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी नगरसेवकांमध्ये पहायला मिळत आहे.शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान शिवाजी चौकामध्ये दोन नगरसेवकांनी एकमेकांचे चेलेचपाटे घेऊन कमिशन वादावरून आमने-सामने आले. नगरसेवकाला कचऱ्याच्या कामातील लाखो रुपयांचा चेक मिळाल्याने महिनाभर झाले ठरल्या प्रमाणे कमिशन न भेटल्यामुळे अनेक दिवसापासून कुरकुर सुरू असल्याचे बोलले जाते. मात्र रात्री साडे नऊला दोन्ही नगरसेवकांनी आप आपले चेलेचपाटे घेऊन थेट शिवाजी चौकात आमने-सामने आले. या दोघांमध्ये कमिशनचा वाद विकोपाला व एकमेकांना पाहून घेऊ अशा धमक्या दिल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.दोन नगरसेवकांत कमीशन वादाची ठिणगी भडकणार का ? अशी चर्चा शहरात दिवस भर सुरू होती. काम कोणतेही असो नगरसेवकांना कमिशन दिल्याशिवाय काम पूर्णत्वास जात नाही हे सर्वश्रुत आहे. शहरांमध्ये विकासाचे अनेक कामे राजकीय दबाव टाकून डमी ठेकेदार म्हणून अनेक नगरसेवक काम करत असल्याचे पालिकेत बोलल्या जाते.यामुळे विकास कामाचा दर्जा कुठेही दिसून येत नसून शासनाचा कोटी रुपयांचा चुराडा होत असल्याचे शहरातील जाणकार लोक बोलतात.
कोरोना संसर्ग व संचारबंदी लागू असताना सर्वसामान्य जनता पिंजुन निघालेली आहे. दोन वेळचं जेवण त्यांना नशिबी नसतांना या गोरगरीब जनतेकडे दुर्लक्ष करून नगरसेवकांचा कमिशन वाद भर चौकात झाल्याने ही घटना लोकशाहीमध्ये अशोभनीय असून अशा नगरसेवकांकडून विकास कामाच्या अपेक्षा कशा पूर्ण होतील हे न बोलले बरे! अनेक कामातून कमिशन कसे मिळवता येईल यामध्ये नगरसेवक रात्र दिवस गुंतलेले असल्याचे दिसून येत आहे. यावरून पालिकेतील नगरसेवकांचा कारभार “दोस्ती पक्की; कमिशन अपना अपना” अशी प्रचिती शहरवासीयांना पहावयास मिळत आहे. दिग्रस पालिकेला लागलेली कमिशन कीड मंत्री महोदय थांबविणार का ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत.
दोन्ही नगरसेवकांवर १०७ नुसार कारवाई करु
शहराची शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधित घटनेवरून दोन्ही नगरसेवकांवर १०७ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.दोन्ही गटाकडून तक्रार दाखल नाही.असे ठाणेदार आमले यांनी सांगितले.