उद्धव ठाकरेंची खळबळ उडवणारी ‘ती’ घोषणा, ‘महाविकास आघाडी’ तुटणार?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना (UBT) ने मुंबईतील अंधेरीमध्ये जाहीर मेळावा घेतला. ज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा करत महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे उघडउघड संकेत दिले आहेत.
पण उद्धव ठाकरेंच्या याच इशाऱ्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. जर आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना एकट्याने लढणार असेल तर महाविकास आघाडी फुटणार का? या चर्चेला आता तोंड फुटलं आहे.
2019 विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली होती. त्याच वेळी राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. मात्र, आज (23 जानेवारी) उद्धव ठाकरेंनी जे स्वबळाचे संकेत दिले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्याची आता दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडी तुटणार?
मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. जर ही महापालिका महाविकास आघाडीमध्ये राहून आपण लढलो तर त्याचा फटका बसू शकतो. असा कयास पक्षातील अनेक नेत्यांनी व्यक्त केल्याने उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला असू शकतो.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना हा सध्याच्या घडीला मोठा पक्ष आहे. कारण राज्यात त्यांचेच सर्वाधिक आमदार आहेत. अशावेळी जर त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर सहाजिकच त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो.
शिवसेना (UBT) यातून बाहेर पडल्यानंतर यामध्ये केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्षच राहतील. अशावेळी ज्या परिस्थितीत महाविकास आघाडी बनविण्यात आली होती त्याच्या मूळ उद्देशालाच धक्का लागेल.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात भरघोस यश मिळालं होतं. मात्र, त्यानंतर अगदी काही महिन्यातच ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यात महाविकास आघाडीला प्रचंड मोठा हादरा बसला. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या पक्ष फुटण्याचा मुद्दा काही चालला नाही.
तसंच आमदारांची जी संख्या कमी झाली आहे त्यामुळे शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचा आगामी काळात बराच कस लागणार आहे. अशावेळी शिवसेना UBT ने आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी स्वबळाची तयारी केली असल्याचं बोललं जात आहे.
पण त्यांच्या या निर्णयाचा थेट परिणाम हा महाविकास आघाडीवर होऊ शकतो. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.