माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांच्या मुलाची आत्महत्या…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मंचर :- “मंचर येथील माजी खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचे चिरंजीव विकास किसनराव बानखेले (वय ५२) यांनी गुरुवार, दि. २३ रोजी मंचर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आत्महत्येचे कारण समजले नाही.
विकास किसनराव बाणखेले नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी गावात आले होते, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांबरोबर गप्पा मारून ते घरी गेले. ते जेवणासाठी साडेअकरा वाजता आले नसल्याने त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि लाला अर्बन बँकेचे संचालक रामदास बाणखेले यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला. परंतु आवाजाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता विकास यांनी एका वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
घटनास्थळी मंचर पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आहे. त्यानुसार मंचर पोलिसांनी रामदास बाणखेले यांच्या फिर्यादीनुसार विकास बाणखेले यांनी आत्महत्या केल्याचा गुन्हा पोलीस हवालदार तानाजी हगवणे यांनी दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार सुमित मोरे करत आहे. विकास बाणखेले यांची पत्नी वर्षा बेंगलोर येथे शिक्षिका असून मुलगा साईराज त्यांच्या सोबतच असतो. विकास बाणखेले मंचर येथील लाला अर्बन बँकेत लेखनिक म्हणून काम करत होते.
स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचे विकास हे धाकटे चिरंजीव होतं. विकास बाणखेले यांचा मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला असून शुक्रवार दि. २४ रोजी सकाळी नऊ वाजता मंचर येथील वैकुंठ भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.