“.तर देवेंद्र फडणवीसांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे”, ‘त्या’ गौप्यस्फोटावरून शरद पवारांचा टोला..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- *राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
अशातच आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात जी राष्ट्रपती राजवटी लागू झाली ती शरद पवार यांच्या पत्रामुळे लागू झाली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या आरोपाला शरद पवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं?
यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटाबाबतही विचारण्यात आलं. याबाबत बोलताना २०१९ मध्ये महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट शरद पवारांमुळे लागली असं जर देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर मी त्यांचा आभारी आहे, तेव्हा मी सत्तेत नव्हतो, माझ्याकडे कोणत्या संस्थेचं सदस्यत्व नव्हतं. तरी मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागत असेल, तर याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे, माझं स्थान काय आहे, असा पलटवार शरद पवार यांनी केला.
नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यात माझा कोणताही हात नव्हता. मात्र, प्रत्यक्षात त्यांनीच पाठवलेल्या पत्रामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली. ते पत्रही माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना, २०१९ मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी बरोबर बैठक झाली होती. १० नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे स्पष्ट होतं. त्या बैठकीत हेही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर सरकार स्थापन करू. यादरम्यान, शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र येतील, अशी घोषणा करतील. हे सर्व शरद पवार यांच्या सूचनेनुसार ठरलं होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.