‘तुमच्या उमेदवाराच्या.’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.
राहुल गांधी यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या चर्चेमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांना तुमच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचारासाठी जातोय, असे सांगितले. या संवादाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली. महायुती व महाविकास आघाडीमध्ये तुल्यबळ लढत होत असून वंचित बहुजन आघाडी स्वबळावर रिंगणात आहे. अनेक मतदारसंघात मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने मोठी खेळी करून वंचितला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न देखील केले. त्यामुळे अकोला पश्चिम, नागपूर मध्यसह अनेक ठिकाणी वंचित आघाडीवर नामुष्की ओढवली होती. त्यानंतर वंचितने उलट डाव टाकला. वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे काही ठिकाणी काँग्रेस उमेदवार देखील अडचणीत आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून प्रचाराचा धुराळा उडत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच प्रकृती अस्वस्थ्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर पुणे येथे रुग्णालयात दाखल झाले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर ‘अँजिओप्लास्टी’करण्यात आली. उपचारातून काही दिवसांतच प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा प्रचारात सक्रिय झाले आहेत. राहुल गांधी यांनी आज त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. राहुल गांधी यांनी प्रकृतीची विचारपूस केली. विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील एकूणच राजकीय परिस्थिती लक्षात घेता राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात राजकीय चर्चा घडल्याचे बोलल्या जात होते. मात्र, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
राहुल गांधींनी प्रकृती कशी आहे? अशी विचारणा केली. त्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रकृती उत्तर असल्याचे सांगितले. सध्या काय सुरू आहे, असे राहुल गांधी यांनी विचारताच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तुमच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचारासाठी जातोय, असे म्हटले.
दोन्ही नेत्यांमधील संवाद त्यानंतर संपला.
ऐन निवडणुकीत राहुल गांधींचा प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला होता. हे लोणी लावण्याचे प्रकार आहेत, असा टोला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.