वृत्तपत्राच्या पीडीएफ फॉरवर्ड करणे गुन्हा नाही
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लॉकडाऊनच्या काळात काही ठिकाणी वृत्तपत्रांचे वितरण बंद आहे. तरीही वाचकांना विश्वासार्ह महिती मिळावी यासाठी वृत्तपत्रांच्या पीडीएफ फईल मोबाईलवर फॉरवर्ड केल्या जात आहेत. वृत्तपत्रांनीच लोकांच्या सोयीसाठी पीडीएफ स्वरूपात वृत्तपत्र पाठविण्यास सुरूवात केली आहे.
त्यामुळे नागरिकांनी त्या फॉरवर्ड करणे कायदेशिर आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, असा निर्वाळा पोलिसांतर्फे देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी वृत्तपत्रांच्या वितरणाला अडचणी येत आहेत. या काळात अचूक माहितीचे शस्त्र नागरिकांच्या हाती असावे यासाठी अनेक वृत्तपत्रांनी पीडीएफ उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिक या पीडीएफ एकमेकांना पाठवितात. पीडीएफ स्वरूपातील वृत्तपत्र पाठविणे गुन्हा असल्याची अफवा पसरली आहे. मात्र, हे पूर्णपणे तथ्यहिन आहे. वृत्तपत्र व्यवस्थापनानेच ही सुविधा नागरिकांना दिली असल्याने त्याबाबत हा गुन्हा ठरतच नाही, असे पोलीसांतर्फे सांगण्यात आले आहे.
लोकांनी जास्तीत जास्त अचूक आणि विश्वासार्ह बातम्या वाचायला मिळाव्यात. या हेतुने वृत्तपत्रांचा ऑनलाईन अंक उपलब्ध करून दिला गेला आहे. लोकांना विश्वासार्ह माहिती देणारा अंक कोणी फॉरवर्ड करत असेल तर कोणत्याही प्रकारचा गुन्हा होऊ शकत नाही. कारण हा ऑनलाईन अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी तो उपलब्ध करून दिलेला असतो. तो आहे त्या स्वरूपात तसाच व कितीही जणांना फॉरवर्ड करण्यास कोणतेही बंधन नाही. यामुळे कॉपी राईट कायद्याचा भंग होत नसल्याने कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र कोणी पीडीएफ मध्ये छेडछाड करू नये, आपले फोटो, मजकूर यावर मार्फीग करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
*******************””””””””””””””””
वृत्तपत्रांनी ऑनलाईन पाठविलेली त्यांच्या अंकाची प्रत ही जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी. या उद्देशाने पाठविलेली असते. या काळात लोकांपर्यंत बातम्या पोहचाव्यात, यासाठी त्यांनी पाठविलेली पीडीएफ स्वरूपातील अंक लोकांनी फॉरवर्ड केला तर कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. मात्र, त्या अंकामध्ये छेडछाड केली, त्यातून समाजात तेढ निर्माण होणार असेल किंवा व्देष पसरणार असेल तर कॉपीराईट अॅक्टचा भंग केला म्हणून वृत्तपत्राने तक्रार दिल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. केवळ वृत्तपत्रांच्या अंकाची पीडीएफ फॉरवर्ड केल्याने गुन्हा दाखल होऊ शकत नाही
– जयराम पायगुडे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सायबर पोलीस ठाणे, पुणे