“ठाकरेंबद्दल आजही आस्था, ते मला भेटायचेही, पण.”, बच्चू कडू यांनी शिंदेंसोबत जाण्याचं कारण सांगितलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंद यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात जात बंडखोरी केली. आधी सूरत मग गुवाहाटी त्यानंतर गोवा अन् मग मुंबई असा प्रवास करत भाजप -देवेंद्र फडणवीसांसोबत जात सरकार स्थापन केलं.
या घटनेनंतर शिंदेगटातील आमदारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह अन्य नेत्यांवर गंभीर आरोप लावले. ठाकरे भेटीसाठी वेळ देत नाहीत, हा मुख्य आरोप करत त्यांनी शिंदेंना (Eknath Shinde) पाठिंबा दिला. यात तत्कालिन मंत्र्यांचादेखील समावेश होता. पण या सगळ्यानंतर तत्कालिन राज्यमंत्री बच्चु कडू (Bacchu Kadu) यांनी आपली बाजू मांडली आहे.
बच्चु कडू यांनी ठाकरे भेटत असल्याची कबुली दिली आहे. पण त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. उद्धव ठाकरे मला भेटायचे. अपंगांचे प्रश्न घेऊन मी अनेकदा त्यांच्याकडे गेलो. ते सर्वसामान्यांची कामं करायला तयार असायचे. पण आजूबाजूचे लोक कामच करायचे नाहीत. अधिकारी वर्ग टाळाटाळ करायचा. त्यामुळे लोकांची कामं व्हायची नाहीत. लोक विचारायचे की तुम्ही आता सत्तेत आहात राज्यमंत्री आहात. मग कामं का होत नाहीत?, असं बच्चु कडू म्हणालेत. ते पत्रकारांना एका कार्यक्रमात बोलत होते.
दिव्यांग लोकांच्या संदर्भात अडीच वर्षात एकही मिटिंग झाली नाही, हे योग्य नाही. त्यामुळे शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं बच्चु कडू म्हणालेत.
मतदार संघातील प्रश्न प्रलंबित होते. लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे ठरवलं की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिंदेसोबत जायचं, असं म्हणत बच्चु कडू यांनी शिंदेंसोबत जाण्याचं कारण सांगितलं.
उद्धव ठाकरेंबद्दल आजही मला आस्था आहे. पण ठाकरे मातोश्रीवर जेवढे शोभून दिसायचे. लोकांची कामं व्हायची. तसं त्यांचं काम वर्षा बंगल्यावर म्हणजेच मुख्यमंत्री झाल्यावर तसं दिसलं नाही, असं बच्चु कडू म्हणालेत.