पालकमंत्री यांनी घेतला विविध यंत्रणेचा आढावा ; सिंचन आवर्तनाचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 24 नोव्हेंबर :- जिल्ह्यातील पूस, अरुणावती व बेंबळा या तीन मोठ्या प्रकल्पातून दुहंगामी पीक, रब्बी पीक व उन्हाळी पीक यासाठी सिंचन आवर्तनाचे नियोजन करण्यात आले असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी सिंचन कार्यालयात पाण्याची मागणी नोंदवून सिंचन आवर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृह येथे पालकमंत्री यांनी आज जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती व सिंचन प्रकल्पावरील कालवे सल्लागार समितीची आढावा बैठक तसेच कोविड परिस्थीती व लसीकरण, यवतमाळ शहर वाढीव पाणी पुरवठा योजना व भूमीगत गटार योजना या विषयांवर संबंधीत यंत्रणांचा आढावा घेतला. बैठकीला आमदार संदिप धुर्वे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता मनिष राजभोज, पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले की ज्या भागात सिंचन कमी आहे तेथे सिंचन वाढावे यासाठी सिंचनाच्या योजना हाती घ्याव्या, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे याकरिता कालवे दुरूस्तीचे कामे प्राधाण्याने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यवतमाळ जिल्ह्यात जमीन चांगली आहे, पाऊस पाणी देखील भरपूर आहे त्यामुळे पीक पद्धत बदलवून आर्थिक दृष्टीने फायदेशीर ठरेल असे बागायती क्षेत्र वाढविण्यासाठी तसेच रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याबाबतही त्यांनी सांगितले.
अमृत योजने अंतर्गत यवतमाळ शहर पाणी पुरवठाच्या कामात प्रगती नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणी पुरवठा विभागाने जबाबदारीपुर्वक कामे करावी, कंत्राटदाराकडून माणसे व सामग्री वाढवून उवरित कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. तर भुयारी गटारची काम वेळेत पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरपालीकेच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येवून योग्य नियोजन व समन्वयाने काम करण्याचा सल्ला दिला.
कोविड लसिकरणाचा आढावा घेतांना घरोघरी लसिकरणाची टिम पाठवून पुढील महिण्याच्या 10 तारखेपर्यंत पहिल्या डोजचे 100 टक्के काम पुर्ण करण्याचे तसेच उपलब्ध यादीनुसार पात्र असलेल्या 2 लाख 50 हजार नागरिकांना लवकरात लवकर दुसऱ्या डोज देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.