कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव परिवहन मंत्री आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळात आज पुन्हा बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली असून बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होणार आहे . एसटी महामंडळाने विलीनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अंतरिम वाढ देण्याचा प्रस्ताव महामंडळाने मांडला आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असून मंगळवारी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात सह्याद्री अतिथिगृहावर बैठक झाली. अंतरिम वाढ नेमकी किती असावी याचा प्रस्ताव शिष्टमंडळाने द्यावा, असे परब यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली असून बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होणार आहे. कर्मचाऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.
आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासह काही एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ या बैठकीला हजर होते. कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी कायम आहे. शिवाय वेतनाची शाश्वती वेळेवर वेतन मिळणे यांसह काही मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. यावेळी न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर सर्व विषय असल्याचा पुनरुच्चार परब यांनी बैठकीत केला.
समितीचा अहवाल मान्य केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा अहवाल येईपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे यासाठी अंतरिम वाढीसंदर्भात शासनाने पर्याय दिला आहे. त्यामुळे शिष्टमंडळानेही पर्याय द्यावेत, असा प्रस्तावही त्यांनी बैठकीत ठेवला. यावर कर्मचाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली जाईल, असे शिष्टमंडळाने सांगितले.
या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारले असता, अंतरिम वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासमोर ठेवला आहे. त्यांनीही वेतनवाढीचा प्रस्ताव द्यावा. त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याची हमी राज्य सरकार घेईल. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ठेवला जाईल, असे सांगितले.